Recipes

Recipe 19 :- किम ची - Kim Chi
किम ची मध्ये चांगले Bacteria असतात . तसेच ह्यात कमी Caloriesअसतात .
 सकाळच्या नाष्ट्यासाठी चांगले व बनवायला सुद्धा अगदी सोपे . 
              साहित्य :- 
         हिरवा कोबी एक 
           पाणी 
            काळी मिरी 
              हळद 
                  चवीपूरते मीठ 
                   
                   कृती : 
प्रथम एक कोबी घेऊन तो चांगला धुवावा . त्यानंतर तो दोन भाग मध्ये कापून घ्यावा . एका कुकरमध्ये कोबीचे ते दोन तुकडे ठेऊन ते बुडे पर्यंत पाणी घालावे . त्यात थोडीशी हळद , थोडी काळीमिरी , चवीपुरते मीठ टाकून कुकरच्या ३ शिट्ट्या काढाव्या . कुकर थंड झाल्यानंतर कोबी बाहेर काढावा व कोमट (Luke Warm) झाल्यानंतर तो खावा तसेच कोबी शिजण्यासाठी घातलेले पाणी सुद्धा प्यावे . 



Recipe 18:- काश्मिरी दम आलू - Kashmiri Dum Aloo
वेळ: साधारण १ तास

वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

साहित्य:

१५ ते १८ लहान बटाटे (टीप)

१/२ कप कांदा, बारीक चिरून

१ कप टोमॅटो, बारीक चिरून

१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून

४ ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या, बारीक चिरून

२ टेस्पून काजूची पूड

४ टेस्पून दही, फेटून

१/२ टिस्पून सुंठ पावडर, १ टिस्पून बडीशेप पावडर, २ चिमटी लवंग पावडर

१ टिस्पून धणेपूड

१/२ टिस्पून जिरेपूड

१ टिस्पून गरम मसाला

२ टिस्पून काश्मिरी लाल तिखट (टीप)

१ टिस्पून साधं लाल तिखट

१/४ टिस्पून हळद

चवीपुरते मिठ

३ टेस्पून तेल

तळणासाठी तेल

कृती:

१) बटाटे धुवून घ्यावेत. पातेल्यात मिठाचे पाणी उकळवावे. त्यात हे बटाटे सोडून १० मिनीटे झाकण ठेवून किंचीत शिजू द्यावे, जेणेकरून वरचे साल काढता येईल. १० मिनीटांनी पातेल्यातील गरम पाणी काढून गार पाणी सोडावे. आणि बटाट्याचे साल काढून घ्यावे.

२) कढईत तेल गरम करून त्यात बटाटे मिडीयम हाय आचेवर गोल्डन ब्राऊन तळून घ्यावे. खुप भरभर तळून काढू नये. नाहीतर बटाटे बाहेरून ब्राऊन होतात आणि आतून शिजत नाहीत. तळलेले बटाटे टिपकागदावर काढून घ्यावेत. काट्याने किंचीत टोचून घ्यावे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये घातल्यावर आतपर्यंत ग्रेव्ही मुरेल.

३) कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात आले लसूण परतावे. कांदा घालून लालसर होईस्तोवर परतावे. साधं लाल तिखट, काजूची पूड आणि टोमॅटो घालावा.मिठ घालून टोमॅटो अगदी नरम होईस्तोवर परतावे. हा मसाला थोडा गार होवू द्यावा. नंतर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे.

४) त्याच कढईत १ चमचा तेल घालून हळद आणि काश्मिरी लाल तिखट घालावे. त्यावर कांदा-टोमॅटोची प्युरी घालावी. प्युरी उकळायला लागली कि त्यात सुंठ पावडर, बडीशेप पावडर, लवंग पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला घालून मिक्स करावे.

५) दही घालण्यापूर्वी ५ मिनीटे आच एकदम कमी करावी. नंतर दही घालून भराभर मिक्स करावे म्हणजे दही फुटणार नाही. एग बिटरने मिक्स करावे म्हणजे दही व्यवस्थित मिक्स होईल.

६) दही निट मिक्स झाले कि तळलेले बटाटे घालावेत आणि झाकण ठेवून १५ मिनीटे ग्रेव्ही आटू द्यावी. मधेमधे झाकण काढून ढवळावे म्हणजे ग्रेव्ही तळाला चिकटणार नाही.

गरजेइतका दाटपणा येऊ द्यावा. ग्रेव्ही भातावर किंवा पोळीबरोबर उत्तम लागते.

टीप:

१) जर लहान बटाटे नसतील बटाट्याचे मोठे तुकडे करून वरीलप्रमाणेच वापरता येतील.
२) काश्मिरी तिखट रंग येण्याकरता घातले आहे. या मिरची पावडरला तिखटपणा नसतो म्हणून नेहमीच्या वापरातील लाल तिखटही घालावे.


Recipe 17:-पनीर लॉलीपॉप - Paneer Lollypop

वेळ: ३० मिनिटे

वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१ कप पनीर, किसलेले

२ मध्यम बटाटे, उकडलेले

दिड टीस्पून आले, किसलेले

१ टीस्पून लसूणपेस्ट

२ टीस्पून लाइट सोय सॉस

१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून

१ टेस्पून कॉर्न स्टार्च

१/२ टीस्पून पांढरी मिरपूड

२ ते ३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून

१/४ कप कांदा, बारीक चिरून

३ टेस्पून मैदा,

चवीपुरते मीठ

तळण्यासाठी तेल

८ ते १० लाकडी स्टिकस किंवा बेबी कॉर्न्स

कृती:
१) बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.

२) मैदा सोडून सर्व साहित्य एकत्र करून छान मळून घ्यावे. मध्यम आकाराचे ८ ते ९ गोळे बनवावे.

३) १ गोळा घेऊन तो नीट दाबून घट्ट करावा व त्यात लाकडी स्टिक एका बाजूने घालावी. मुठीने नीट आवळून नीट बांधून घ्यावा, जेणेकरून तेलात सोडल्यावर गोळा सुटणार नाही. अशाप्रकारे सर्व लॉलीपॉप बनवून घ्यावे.

४) तयार लॉलीपॉप कोरड्या मैद्यामध्ये घोळवून घ्यावे. किंचित हलवून जास्तीचा मैदा काढून टाकावा.

५) पुरेसे तेल तापवून आच मध्यम करावी आणि सर्व लॉलीपॉप तळून घ्यावे. तळताना मध्येमध्ये लॉलीपॉप झाऱ्याने फिरवावेत, म्हणजे सगळीकडून नीट तळले जातील.

गरमागरम लॉलीपॉप शेझवान सॉस किंवा टोमाटो केचप बरोबर सर्व्ह करावेत.
टीप:
आईसक्रीम कॅन्डीला जी लाकडी स्टिक असते ती वापरावी. प्लास्टिक किवा इतर मटेरियल वापरू नये जे तेलात जळू शकेल.

Recipe 16:-मूगडाळ हलवा - Moong dal halwa

वेळ: साधारण १ ते दिड तास

२ ते ३ जणांसाठी
साहित्य:

३/४ कप पिवळी मूग डाळ

१/२ कप दूध, गरम

साधारण ३/४ ते १ कप पाणी (टीप ३)

१/४ ते १/२ कप खवा, भाजलेला

४ टेस्पून साजूक तूप

१/२ ते ३/४ कप साखर

१/२ टिस्पून वेलचीपूड

२ ते ३ बदाम
कृती:

१) मूगडाळ मध्यम आचेवर साधारण गुलाबी-लालसर परतावे. साधारण ३० ते ३५ मिनीटे सतत ढवळावे. डाळ जळू देऊ नये किंवा खुप डार्क भाजू नये. तसेच एकसारखी भाजली गेली पाहिजे. मूगडाळ जरा कोमट झाली कि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यावी. अगदी किंचीत भरड राहू द्यावी.

२) कढईत तूप गरम करून त्यात मूगडाळ पावडर घालून मध्यम आचेवर छान केशरी रंग येईस्तोवर भाजून घ्यावी. साधारण १० मिनीटे. नंतर १/२ कप गरम दुध थोडे थोडे घालून वाफ काढावी. बदामाचे काप घालावे. गॅस मंद करावा सर्व दुध घालावे आणि अगदी मंद आचेवर वाफ काढावी. मधेमधे ढवळावे, तळाला डाळ चिकटू देवू नये. नंतर गरम पाण्याचा हबका मारून ढवळत राहावे. डाळ पूर्ण शिजेस्तोवर मंद आचेवर वाफ काढावी.

३) डाळीचा रवा निट शिजला आणि थोडा फुलून आला कि त्यात १/२ साखर घालावी आणि खवा घालावा, वेलचीपूड घालावी. ढवळून अजून थोडावेळ वाफ काढावी. खवा निट मिक्स झाला पाहिजे, गुठळ्या राहू देवू नये.

गरमागरम मूगडाळीचा हलवा वरती बदामाचे काप घालून सर्व्ह करावा.




Recipe 15:- काजू कतली - Kaju Katli
वेळ: १५ ते २० मिनिटे
१२ ते १५ मध्यम वड्या

साहित्य:
सव्वा कप काजूची बारीक पूड

३/४ कप पिठी साखर

१/२ कप मिल्क पावडर

१/४ कप दूध

१ टीस्पून तूप

१/४ टीस्पून वेलचीपूड

चांदीचा वर्ख सजावटीसाठी

कृती:

१) सव्वा कपपैकी १ कप काजू पूड, तूप, पिठी साखर, मिल्क पावडर, दुध आणि वेलची पावडर एका काचेच्या बोलमध्ये एकत्र करावे. नीट मिक्स करावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.

२) मिश्रण २ ते ३ मिनिटे मायक्रोवेव करावे. दर ५० सेकंदानी ढवळा. मिश्रण चांगले उकळले की बाहेर काढावे. आळेस्तोवर मध्येमध्ये ढवळावे.

३) मिश्रण जरा आळले कि त्यात लागल्यास थोडी काजू पावडर घालावी. नीट मिक्स करून कणिक जेवढी घट्ट असते तसा गोळा तयार करावा.

४) पोळपाटाला किंवा फ्लॅट सरफेसला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर मिश्रणाचा गोळा लाटून जाडसर पोळी लाटावी. चांदीचा वर्ख लावून शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापाव्यात.

टीपा:

१) काजूची पूड एकदम बारीक असावी. वाटल्यास बारीक केकेली पूड बारीक चाळणीने चाळून जाडसर काजूची पूड परत बारीक करावी.

२) काजू कतली मिश्रणात थोडे केशर घातले तरी रंग आणि चव खूप छान येते. गरम दुधामध्ये २-३ चिमटी केशर भिजवून चिमटीने कुस्करून घ्यावे. आणि हे दुध मिश्रणात घालावे.

३) मिल्क पावडरऐवजी हलकासा भाजलेला खवा वापरला तरीही चालेल.




 Recipe 14:- पुरणपोळी - Pooranpoli
{Nandai Bday Special}

१० मध्यम पोळ्या

वेळ: २५ मिनिटे (पुरण व मैदा भिजवून तयार असल्यास)

साहित्य:
१ कप चणाडाळ

१ कप किसलेला गूळ

एक कप मैदा

१/२ कप गव्हाचे पिठ

७ ते ८ टेस्पून तेल

१ टिस्पून वेलचीपूड

कृती: 

१) चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.

२) डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात १ चमचा वेलचीपूड घालावी.

३) मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण जरा गार झाले कि पुरणयंत्रातून ते फिरवून घ्यावे. 

४) मैदा आणि कणिक मिक्स करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे. आणि सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पिठ १-२ तास मुरू द्यावे.

५) पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.

६) पोळपाटावर थोडा मैदा भुरभुरवून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.

साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.



Recipe 13:-  गाजर लोणचे -Carrot Pickle
वेळ: १०-१५ मिनिटे
१ कप लोणचे
साहित्य:
१ कप बारीक चिरलेले गाजर
१ टेस्पून मोहोरी पावडर
१/२ टीस्पून मेथीदाणे
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ ते ३ चिमटी मोहोरी, १/२ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
एका लिंबाचा रस
चवीनुसार मीठ

कृती:
१) चिरलेले गाजर, मोहोरी पावडर, लिंबाचा रस, आणि मीठ एकत्र करून घ्यावे.
२) कढल्यात २ टीस्पून तेल घ्यावे. त्यात आधी मेथीदाणे तळून घ्यावे आणि एका वाटीत काढून ठेवावे.
३) त्याच गरम तेलात मोहोरी, हिंग, हळद, आणि लाल तिखट घालून फोडणी करावी. हि फोडणी एका वाटीमध्ये काढून ठेवावी. थंड झाल्यावर गाजरामध्ये मिक्स करावी.
४) मेथीदाणे बत्त्याने किंवा चमच्याने चुरून घ्यावे. गाजरामध्ये मिक्स करावे.
हे लोणचे जेवणात तोंडीलावणी म्हणून घ्यावे. साधारण ७ ते ८ दिवस फ्रीजमध्ये टिकते.

Recipe 12:-कोल्हापूरी मिसळ - Kolhapuri Misal

साहित्य: 
१ वाटी मटकी
१ बटाटा
तळण्यासाठी तेल
१ कांदा
१ टोमॅटो
गरम मसाला
फरसाण
पोहे कुरमुर्याचा चिवडा
कोथिंबीर
लिंबू
ब्रेडचे स्लाईस
कट बनवण्यासाठी साहित्य :३-४ लसूण पाकळ्या
१ इंच आले
२-३ मिरी
१ लहान काडी दालचिनी
२-३ लवंगा
१ तमालपत्र
१ चमचा जिरेपूड
१ चमचा धनेपूड
अर्धी वाटी खवलेला ओला नारळ
१ मध्यम कांदा
२ मध्यम टोमॅटो
४-५ लहान चमचे लाल तिखट
फोडणीसाठी तेल
आमसुल किंवा चिंच
मीठ

कृती:
१) मटकी १०-१२ तास कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून मोड काढावेत.
२) मटकीला मोड आले कि कट बनवून घ्यावा. त्याचवेळी मटकी कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.
३) कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यावे.
४) कढईत ४-५ चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून खमंग परतावा. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात १ कांद्याच्या आणि २ टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे. मिश्रण थंड झाले कि त्यात १ भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी.
५) नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी. पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी. थोडे पाणी घालावे, १-२ चमचा गरम मसाला घालावा. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसर्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे (साधारण अर्धी वाटी). (बटाटे तळल्यावर ७-८ चमचे तेल उरले कि त्यातच कट बनवता येतो.)
६) १ बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे.
७) लहान कढई खालचा गॅस बारीक करून उरलेल्या तेलात हळद, हिंग, ४-५ चमचे लाल तिखट घालून तयार केलेली मसाल्याची पातळ पेस्ट घालावी. मीठ घालावे. आंबटपणासाठी २-३ आमसुल किंवा थोडा चिंचेचा कोळ घालावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून १ उकळी काढावी.
८) उसळ आणि कट तयार झाला कि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
९) नंतर डिशमध्ये १ डाव उसळ घालावी. त्यावर १ पळी कट घालावा. त्यावर चिवडा, फरसाण, कांदा, टोमॅटो घालावे. लिंबू पिळून तयार मिसळ स्लाईस ब्रेडबरोबर खावी.


टीप:
१) ओला नारळ उपलब्ध नसेल किसलेला सुका नारळसुद्धा वापरू शकतो.
२) ज्यांना तळलेले बटाटे नको असतील त्यांनी शिजवलेले बटाटे घातले तरी चालते. तळलेले बटाटे उसळीत फुटत नाहीत, शिजलेले बटाटे मिसळीत फुटून मिसळ घट्ट होऊ शकते.

Recipe 11:-चिली गार्लिक टोफू 

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी

साहित्य:
५ औंस फर्म टोफू (साधारण १०-१२ मध्यम तुकडे )
१ टेस्पून कॉर्न स्टार्च
४ टीस्पून तेल
१ टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून आले पेस्ट
२ टीस्पून चिली गार्लिक पेस्ट
१/४ कप पाती कांद्याचा हिरवा भाग, बारीक चिरून
१/४ कप कांदा, मध्यम आकाराचे तुकडे (कांद्याच्या पाकळ्या विलग करा)
१/४ कप भोपळी मिरची, मध्यम तुकडे
१ टीस्पून सॉय सॉस
१/२ टीस्पून व्हिनेगर
चवीपुरते मीठ

कृती:
१) टोफू हलक्या हाताने प्रेस करून त्यातील थोडे पाणी काढून टाकावे. खूप जास्त प्रेस करू नये त्यामुळे टोफू कुस्करला जाउ शकतो. टोफूचे १ इंचाचे तुकडे करावेत. त्यावर कॉर्न स्टार्च भुरभुरावा. आणि हलकेच मिक्स करावे.
२) एक मध्यम पॅन घेउन त्यात १ टेस्पून तेल घालावे. त्यात टोफू शालो-फ्राय करून घ्यावा. सर्व बाजू थोड्या ब्राउन करून घ्यावात. शालो फ्राय करून झाले कि टोफू प्लेटमध्ये काढून ठेवावा.
३) त्यात पॅनमध्ये अजून १ टीस्पून तेल घालावे. त्यात आले लसूण पेस्ट परतावी. सॉय सॉस, भोपळी मिरची आणि कांदा घालून एक मिनिटभर परतावे. मीठ घालावे. कांदा आणि भोपळी मिरची क्रिस्पी राहिल्या पाहिजेत.
४) १ टीस्पून कॉर्न स्टार्च आणि ३ ते ४ टेस्पून पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. चिली गार्लिक पेस्ट आणि व्हिनेगर घालावे. मिक्स करावे.
५) आता शालो फ्राय केलेला टोफू घालावा. हलकेच मिक्स करून मिनिटभर शिजवावे. प्लेटमध्ये सर्व्ह करावे. सर्व्ह करताना पाती कांद्याची चिरलेली पात घालून सजवावे.

टीपा:
१) वरील रेसिपी ड्राय टोफूची आहे. थोडी ग्रेव्ही हवी असेल १ टेस्पून कॉर्न स्टार्च १/२ कप पाण्यात घालून मिस्क करावे. आणि स्टेप ४ मध्ये चिली गार्लिक पेस्टसोबत हे मिश्रणही घालावे. बाकी सर्व कृती सेम. या ग्रेहीबरोबर थोडा पांढरा भातही सर्व्ह करू शकतो.
२) वरील रेसिपीसाठी "फर्म टोफू" च वापरावा. इतर टोफू एकदम मऊ असतात आणि फ्राय करता येत नाहीत.

-*-*-*-**-*-*-*-*-
Recipe 10:-मलाई कोफ्ता - Malai Kofta

वेळ: साधारण दीड तास
३ जणांसाठी

साहित्य:
कोफ्ता आवरणासाठी:
३ मध्यम बटाटे
२ टेस्पून कॉर्न फ्लोर
चवीपुरते मीठ (१/४ चमचा)
तळणीसाठी तेल
सारणासाठी:
१/२ कप किसलेले पनीर
२ चिमटी मीठ
१/२ टीस्पून साखर
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
२५ बेदाणे
२ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
ग्रेव्हीसाठी:
१ मोठा पांढरा कांदा, मधोमध अर्धा चिरून सोलून घ्यावा
२ टीस्पून बटर
२ हिरव्या मिरच्या
३ मोठ्या लसणीच्या पाकळ्यांची पेस्ट
१/२ टीस्पून आलेपेस्ट
अख्खा गरम मसाला:- २ तमालपत्र, २-३ लवंग, ३ मिरी दाणे, १ लहान दालचीनी, २ वेलची
२ टेस्पून दाटसर काजूपेस्ट
१/२ कप हाफ अँड हाफ (टीप ५)
चवीपुरते मीठ

कृती:
कोफ्ता:
१) बटाटे उकडून घ्यावेत. सोलून व्यवस्थित मॅश करून घ्यावेत. गुठळी अजिबात राहू देवू नये. यामध्ये २ टेस्पून कॉर्न फ्लोर आणि चवीपुरते मीठ घालून माळून घ्यावे. या मिश्रणाचे साधारण ८ समान भाग करावेत.
२) सारणाचे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्स करावे. याचेही ८ समान भाग करावेत.
३) बटाट्याचे मिश्रण घेउन हातानेच चपटे करून परी तयार करावी (साधारण अडीच ते ३ इंच). मधोमध सारण ठेवून सर्व कडा एकत्र आणाव्यात आणि सीलबंद करावे. अशाप्रकारे सर्व कोफ्ते तळण्यासाठी तयार करावेत. कोफ्त्याचा सरफेस एकदम स्मूथ असावा. भेग पडली असेल तर नीट बंद करावी. कारण तळताना सारण बाहेर येउन कोफ्ता फुटतो.
४) सर्व कोफ्ते मध्यम आचेवर गोल्डन रंगावर तळून घ्यावे. टिपकागदावर काढून ठेवावे.
ग्रेव्ही:
५) कांदा उकडून घ्यावा. (मी प्रेशर कुकरमध्ये २ शिट्ट्या करून कांदा उकडला होता). उकडलेल्या कांद्याची बारीक पेस्ट करावी.
६) पॅनमध्ये बटर गरम करून त्यात अख्खे गरम मसाले घालावेत. नंतर हिरवी मिरची आणि आलेलसूण पेस्ट घालावी. १५ सेकंद परतावे. आता कांद्याची पेस्ट आणि मीठ घालून हाय हिटवर परतावे. जोवर रंग किंचित गुलाबी होईतोवर सतत ढवळावे.
७) काजू पेस्ट घालावी. तळापासून ढवळत राहावे, कारण काजू पेस्ट तळाला चिकटू शकते. किंचित पाणी घालावे. झाकण ठेवून काजूचा कच्चट वास जाईस्तोवर मध्यम आचेवर शिजवावे (३ ते ४ मिनिटे) (टीप)
८) आच एकदम कमी करावी आणि उष्णता थोडी कमी होईस्तोवर थांबावे. आता हाफ अँड हाफ घालून जोरजोरात ढवळावे. कारण कांदा आणि मीठ यामुळे हाफ अँड हाफ फुटण्याची शक्यता असते. एकदा का व्यवस्थित मिक्स झाले कि आच मिडीयम वर ठेवावी आणि काही मिनिटे शिजवावे.
कोफ्त्यावर हि गरमागरम ग्रेव्ही घालून लगेच सर्व्ह करावे.

टीपा:
१) स्टेप ७ मध्ये, काजूपेस्ट व्यवस्थित शिजल्यावर मी अख्खे गरम मसाले काढून टाकले होते. नंतर हि ग्रेव्ही एकदा मिस्करमध्ये बारीक केली ज्यामुळे ती एकदम स्मूथ झाली. हि ग्रेव्ही मी परत पॅनमध्ये घेतली आणि स्टेप ८ फॉलो केली.
२) बटाटे व्यवस्थित मॅश करावेत. गुठळी राहिली तर कोफ्ते गरम तेलात फुटण्याची शक्यता असते.
३) जर गरम मसाला किवा इतर कुठलाही मसाला घातल्यास ग्रेव्हीचा रंग बदलेल. म्हणून अख्खे गरम मसाले वापरले आहेत, ज्यामुळे ग्रेव्हीला मसाल्यांचा हलकासा स्वाद येतो आणि ग्रेव्हीचा रंगही बदलत नाही.
४) सारणामध्ये काजू बदाम पिस्ता यांचे तुकडे घालू शकतो.
५) हाफ अँड हाफ म्हणजे १ भाग क्रीम आणि १ भाग दुध (होल मिल्क) यांचे मिश्रण.


Recipe 9:-काकडीचा डोसा (Cucumber Dosa)


साहित्यः


  • १ कप गव्हाचे पीठ

  • १/४ कप तांदळाचे पीठ

  • १/४ कप बारिक रवा

  • २ कप कापलेली काकडी

  • चविनुसार हिरव्या मिरच्या, मीठ

  • थोडे तेल



कृती:

  • मिक्सरमध्ये काकडी, मीठ आणि मिरची घालून चांगली पेस्ट तयार करून घ्या.
  • नंतर ह्या पेस्ट मध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ,रवा आणिगरजेपुरते पाणी घालून चांगले हलून घ्या.
  • ह्या पीठाचे नेहमीच्या डोस्यासारखे डोसे तयार करा.
  • हे गरमागरम डोसे कोणत्याही चटणी,सॉस किन्वा बटाट्याच्या भाजी बरोबर खाता येतील.


Recipe 8:- सोयाबीन कटलेट (Soyabean Cutlets)

साहित्य : 
  • अर्धा कप सोया ग्रनुअल्स
  • अर्धा कप उकडलेले मुग
  • एक उकडलेला बटाटा
  • पाव कप बारीक चिरलेला कांदा
  • एक टी स्पून गरम मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ
  • थोडा रवा
  • तेल 

कृती :


  • सोया ग्रनुअल्स शिजवून घेऊन त्यातले पाणी काढून टाका. बटाटा चांगला मॅश करून घ्या. 
  • एका पसरट भांड्यामध्ये सोया ग्रनुअल्स, मुग, बटाटा, कांदा, गरम मसाला, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या. 
  • एका बाजूला नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून दाबून त्यांना कटलेट चा आकार द्या.
  • एका प्लेट मध्ये रवा पसरवा. त्या रव्यावर कटलेट ठेवून कटलेट दाबा म्हणजे रवा कटलेट ला चांगला लागेल. हा रवा कटलेट च्या दोनही बाजूना लावा. 
  • गरम झालेल्या तव्यावर तेल टाकून हे कटलेट त्यावर दोनही बाजूने तांबूस होईपर्यंत भाजा. 
  • हे गरमागरम कट्लेट कुठल्याही सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.  



Recipe 7:-आंबेडाळ {AmbeDaal}

साहित्य :- १ वाटी चणाडाळ .
                 १/२ वाटी कैरीचा कीस
                 १/२ लहान चमचा साखर.
                 मीठ {चवीनुसार}
कृती:
          १} चणाडाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी . भिजल्यावर सर्व पाणी काढून टाकावे. व त्यात कैरीचा कीस घालून मिक्सरवर भरडसर वाटून घ्यावी.
           २} वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्यावे व त्यात साखर , मीठ घालून एकत्रित करावे.


 
Recipe 6:-कैरीचे पन्हे {Kairi Panhe}

साहित्य:
      १} दीड कप कैरीचा गर {कृती क्र १}
      २ कप साखर
      ३} १ टीस्पून वेलची पूड.
      ४} चिमुटभर केशर { इच्छे नुसार}

कृती:- १} साधारण १ मोठी कैरी {साधारण १ ते दीड पौंड} कुकरमध्ये शिजवून घ्या.थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढून घ्या. चाळणीवर हा गर गाळून घ्या.चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
        २}साखर पातेलात घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी {साधारण १/२ पाऊन कप}घालून गोळीबंद पाक करावा. पाक तयार झाला कि त्यात केशर आणि वेलची पूड घालावी. कैरीचा गर घालावा.ढवळून घ्यावे. मिश्रण थंड झाले कि काचेच्या बरणीत bharun फ्रीज मध्ये ठेवावे.
        ३} एक ग्लास मध्ये २-३ टीस्पून मिश्रण घालावे.व त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.
टीप: सर्व्ह करताना किंचित मीठ घातले तरी चं लागते.
  गोळी बंद पाक म्हणजे : साखरेला उष्णता दिल्यावर साखर विरघळते आणि पाक बनतो. अजून उष्णता देत गेल्यावर त्यातील पाणी आतून जातेव गोळी बंद पाक तयार होतो.बरोबर गोळी बनली आहे कि नाही हे बघण्यासाठी वाटीत थंड पाणी घेऊन त्यात एक थेंब पाक टाका.जर त्याची लगेच गोळी वळता आली तर पाक बरोबर आहे. लगेच ग्यास बंद करा. नात्र ते kristalize होईल .


Recipe 5:-स्ट्रोबेरी दिलाईत {Strawberry Delight}

Servings: 4 persons

साहित्य :
       ५०० ग्रॅम स्ट्रोबेरी
       २ १/२ कप फ्रेश क्रीम
      १ १/२ कप whipped cream
       १/४ कप साखर
       १ पाकीट ब्रिटानिया लिटील हार्ट्स बिस्किटे
      कृती:- 
 १} स्ट्रोबेरी स्वच्च धुवून पाने काढून टाका. एका स्ट्रो बेरी चे ४ तुकडे या प्रमाणे सगळ्या
    स्ट्रोबेरी चिरून घ्या . एका भांड्यात स्ट्रोबेरीचे तुकडे आणि साखर
    मिक्स करून फ्रीजमध्ये ३ ते ४ तास मुरत ठेवा.
२} स्ट्रोबेरी मध्ये साखर घालून मुरत ठेवल्यावर त्याला थोडे पाणी सुटेल. ब्रिटानिया लिटील
     हार्ट्स चा चुरा करून घ्या.
३} फ्रेश क्रीम मध्ये ४ टेबलस्पून साखर घाला आणि चमच्यानी किवा hand mixer ने फेटून घ्या.
४} काचेचे ४ बाउल घ्या .त्यात सर्वात तळाला बिस्किटांचा थोडा चुरा घाला.त्यावर साखरेत मुरवलेली स्ट्रोबेरी
 घाला. वरती फेटलेले क्रीम घाला. पुन्हा त्यावर बिस्किटांचा चुरा व स्ट्रोबेरी घाला.
५} बाउल फ्रीज मध्ये ठेवा. सर्व्ह करायच्या वेळेस वरती Whipped cream घाला आणि जेवणानंतर सर्व्ह करा.

टीप: ब्रिटानिया लिटील हार्ट्स बिस्किटे नसतील तर इतर कोणतेही गोड बिस्किटे वापरू शकता. 
 
Receipe 4:-वाटर मेलोन जूस

साहित्य
.
वाटर मेलोन चे काप
मीठ १ चिमट
जलजीरा १ चिमट
थोडंसं पाणी
.
कृती
.
मिक्सर जूस च्या भांड्यात फळाचे काप घालून अगदी थोडंसं म्हणजे १/४ कप पाणी घालून फिरवा.
थोडा जास्त वेळ फिरवा.

त्यानंतर त्याला स्ट्रेनर मधून गाळून घ्या.

जूस छान पैकी ग्लास मधून सर्व्ह करा.
ग्लास मध्ये फळाचे छोटे बारीक काप घाला .

तुम्हाला हवे असल्यास एक चिमट मीठ घ्या.
बेस्ट टेस्ट साठी १ चिमट जलजीरा घालून प्या.
.
टीप : मिक्सर मध्ये जास्त वेळ फिरवावा लागता कारण ते पटकन बारीक होत नाही.
आणि गळताना थोडा मोठ्या जाळीच स्ट्रेनर वापरा.

-*-*-*-*-*-*-*-*-*- 
Receipe 3:-Mango chaat (Simple)
 Ingredients
.
2 mangoes, chopped into small pieces
1 tsp chaat masala
1 tsp lemon juice
1 tsp salt
.
Method
.
Mix well Chopped mangoes, chaat masala and salt

squeez lime juice and toss well

njoy ur chatapata dish..!!!
-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-
Receipe 2:-मांगो लस्सी 
२ जणांसाठी
वेळ : १० मिनटे .

साहित्य :
३/४ कप दुध
१ कप दही
३/४ कप आंब्याचा रस {रेडीमेड मांगो पल्प पण वापरू शकता}
४ टीस्पून साखर
१/४ टीस्पून वेलचीपूड
सजावटी साठी बदाम पिस्त्याचा भरडसर चुरा.

कृती : १} दुध, दही , मांगो पल्प , साखर आणि वेलचीपूड एकत्र मिक्सर मध्ये व्यवस्तीत ब्लेंड करून घ्यावी.
   २} सर्व्हिंग ग्लास्सेस मध्ये लस्सी ओतावी.वरून पिस्त, बदामाची भरड टाकून सजवावी .
  फ्रीज मध्ये ठेवावी व मग सर्व्ह करावी.
-*-*-*-**-*-*-*-*-
Receipe 1:- आप्पे

रवा(गहू / तांदूळ)    १ वाटी 
साखर                  ३/४ वाटी
नारळाचे घट्ट दुध   ३/४ वाटी 
वेलची पावडर       १/२ छोटा चमचा 
तूप        
तूप सोडून  वरील साहित्य एकत्र करून , कमीत कामी ५ ते  ६ तास भिजत ठेवावे. आप्पे पत्र गरम करून त्यात  खड्डे ३/४ भाग   भरतील एव्हडे तूप घालणे , तूप गरम झाल्यावर  चमच्याने भिजवलेले मिश्रण खड्ड्यान मध्ये घालणे,  मध्यम आचेवर आप्पे दोन्ही बाजूंनी सोनेरी होई परंत तळून घ्यावेत. वेलची पावडर ऐवजी व्यानीला  इसेन्स वापरल्यास चव छान येते.

SOURCES VIA CHAKALI & NET. 

2 comments:

  1. Delicious Recipes I Had maked all of them my husband loved all shirram alot .

    Jyotiveera

    ReplyDelete
  2. MouthWatering Recipes - Shreya

    ReplyDelete

All Contents Are CopyRighted

myfreecopyright.com registered & protected