!! हरि ओम !!
||अनंत हस्ते कमलावराने | देता घेशील किती दो कराने ||
या शब्दांचे मोल आयुष्यातील प्रत्येक क्षणाला समजलं, पटलं आणि जाणवल ते श्री अनिरुद्धांच्या सहवासात आल्यानंतरच मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचा विद्यार्थी म्हणून नानाविधप्रकारे त्यांच्या बरोबर ज्ञान मिळवत असताना प्रत्येक वेळी जाणीव व्हावयाची ती त्यांच्या ज्ञानाच्या परिपूर्णतेची व बुद्धीच्या अफाट कक्षेची. वार्ड मध्ये राउंड घेताना व ओपीडीमध्ये गरीब दुबळ्या रुग्णांना तपासताना त्यांचे करुणाघन मन हळूहळू मनाला भिडायला लागले.त्याजबरोबर त्यांच्या शिस्तीचा बडगा व सत्यप्रिय स्पष्टोक्ती याचाही वेळोवेळी अनुभव आला.
मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी. करत असताना एवढया विषयांवरील इतक्या विविध पुस्तकांतील ज्ञान ह्यांना कस असत ह्याचं खूप आश्चर्य वाटत असे.तेच आश्चर्य त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या भारतीय विद्यांचा ज्ञानाबद्दल वाटू लागले.विद्यार्थी म्हणून झालेला परिचय हळूहळू स्नेहामध्ये वाढू लागला व उत्तरोत्तर मी त्यांच्या अधिकाधिक सहवासात येवू लागलो. सौ.नंदाताईने मला भाऊच मानले व मी त्यांच्या कुटुंबातील एक पूर्ण घटक झालो.त्यांच्या सहवासात असताना ते काही गोष्टी बोलत असत व त्या गोष्टीची अनुभूती प्रत्यक्ष अनुभवास येत असे.परंतु तरीही त्यांच्या अगाध शक्तीची ओळख व्हायला खूप वेळ लागला.
एके दिवशी रात्री त्यांच्या कन्सल्तिंग रूम वरून निघताना पेशंटस खूप असल्यामुळे रात्रीचे साडे बारा वाजले व मी थकलो असल्यामुळे ट्याक्सीने ठाण्याला जाण्याच ठरविले.निघताना त्यांनी स्वतःच्या हातातील अंगठी काढून माझ्या बोटात घातली व म्हणाले आज हि तुझ्या कडे राहू दे.मी ट्याक्सीने मुलुंडपर्यंत जाण्यास निघालो.रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे ट्याक्सी वेगानेच चालली होती घाटकोपरच्या पुढे गोदरेज कंपनीच्यासमोर एकाएकी माझ्या बोटातील अंगठी गळून खाली पडली. ती उचलण्यासाठी मी खाली वाकलो तेवढ्यात ब्रेक लागून ट्याक्सी थांबली व क्षणार्धात जोरदार आवाज आला व पाठीमागून भरधाव येणारा ट्रक ट्याक्सीवर आदळला . मी वाकलेलाच होतो व मागची काच फोडून ट्रकचा भाग माझ्या एका बाजूला दिसत होता. दारू पिऊन क्रॉस करणाऱ्या चार पाच तरुणांना वाचवण्यासाठी ट्याक्सीवाल्याने जोरात ब्रेक मारले होते. जर मी त्याआधीच वाकलेलो नसतो तर.....,तर तरचे उत्तर मला माहित नाही.आजूबाजूच्या झोपड्यातील ; काही माणसांनी येवून ड्रायव्हरच्या मदतीने बाहेर काढले व मला जराही दुखापत न झालेली बघून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले.तेथून रिक्षा करून मी घरी आलो.घरी पाऊल टाकत नाही तोच फोन वाजला.उचलला तर प्रत्यक्ष माझा रक्षणकर्ताच फोन वर बोलत होता. फोन उचलताच त्यांनी मला समोरून विचारले सर्व व्यवस्थित आहे ना? व त्याच दिवसापासून श्री साई सच्चरिताचा सप्ताह सुरु करण्यास सांगितले .मी हात जोडून डोळे बंद करून श्री साईनाथांचे स्मरण करू लागलो.तेवढ्यात माझ्या डोळ्या समोर एकदा श्री साईनाथ तर एकदा श्री अनिरुद्ध असे आलटून पालटून येवू लागले व कुठून तरी कानावर शब्द आले.
तुमचा मी भार वाहीन सर्वथा | नव्हे हे अन्यथा वाचन माझे ||
त्यानंतर साई सच्चरिताचा सप्ताह करीत असताना श्री अनिरुद्धानी ह्या घटने बद्दल कुठेहि सध्या वाच्यता करू नकोस असे बजावून सांगितले.
त्यानंतर मी वारंवार श्री अनिरुद्धांना,'आपण कोण आहात,'आपण हि अंगठी का दिलीत?'आपल्याला आधीच सर्व कसे माहित होते?'असे प्रश्न विचारीत होतो,तर श्री अनिरुद्ध मात्र प्रत्येक वेळी हसून मला सांगायचे'अरे मीच ट्रकवाल्याला तुझ्यावर सोडले होते.ती माणसे ट्याक्सीच्या आड मीच पाठवली होती.तुला मारण्याचा माझा कट होता म्हणून मला हे सर्व माहित होते.हे उत्तर ऐकून मी शेवटी विचारायचा नाद सोडून दिला.परंतु मनोमन खात्री पटली कि आतापर्यंत वैद्यकीय क्षेत्रातला गुरु म्हणून ज्याच्या वर आपण श्रद्धा भक्ती ठेवली ते व्यक्तिमत्व केवळ शैक्षणिक गुरु नसून एक अगाध सदगुरु तत्त्वच आहे.
वरील घटनेनंतर मला हळूहळू बर्र्याच घटना प्रत्यक्ष समोर घडू लागल्या व श्री अनिरुद्धांची अगाध शक्ती व अफाट सामर्थ्य यांचे वेळोवेळी प्रत्यंतर येवू लागले.गेल्या बारा वर्षातील त्यांच्या सहवासातील सर्वच काय परंतु एक टक्काही घटना सांगायला दिवसच्या दिवस पुरे पडणार नाहीत.१९८७ साली एकदा आम्ही दोघे श्रावण सोमवारी रात्री बाबुलनाथला, मी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे गेलो.मंदिरातून दर्शन घेवून परत येताना एक वृद्ध साधू समोरून धावत येताना दिसला,तो जोरजोराने "मेरे प्रभू ,मेरे मलिक"असे बडबडत होता.त्याला बघताच अनिरुद्ध एका फुलांच्या दुकानाआड गेले व मला म्हणाले हा साधू माथेफिरू आहे.हा माझ्या डोक्यात धोंडा मारेल.तेवढ्यात तो साधू तेथेच आला व श्री अनिरुद्धांना नमस्कार करून त्यांच्या दोन्ही पावलांवर डोके ठेवून "कितने साल से राह देखी हैं प्रभू,आज दया आई आपको"असे म्हणू लागला.तेवढ्यात श्री अनिरुद्धांनी मला श्रीफळ आणण्यास पाठवून दिले.पुढे काय घडले असेल त्याची कल्पना आज आपणा सर्वांना येवू शकेल.परंतु अप्रगट अवस्थेत विहरणाऱ्या ह्या महात्म्याची ओळख पटलेले अनेक सिद्ध जीव त्याही काळी होते,हीच ह्या प्रसंगाची प्रमाणता.
प्रत्यक्ष एकाच छत्राखाली रहायला लागल्यापासून त्यांच्या दिनक्रमाची ओळख झाली व त्यांच्या बरोबर श्री अनिरुद्ध कोण आहेत,कशासाठी आले आहेत ह्याची पुरेपूर ओळख १९९४ च्या हनुमान जयंतीच्या दिवशी झाली त्या दिवशी श्री अनिरुद्धांनी मला ब्राम्हमुहूर्तावर उठून मला हनुमान चालीसाचे १०८ पाठ करण्यास सांगितले.त्याप्रमाणे १०८ पाठ केल्यानंतर मला प्रत्यक्ष मिटल्या डोळ्यांसमोर नाही तर पूर्ण उघड्या डोळ्यांना ह्या चर्मचक्षुना श्री साईनाथांनी सगुण साकार रुपात दर्शन दिले.व आजपासून श्री अनिरुद्धात मला पहा म्हणून सांगितले.त्या दिवसाचा आनंद मी अजूनही प्रत्यक्षाने उपभोगत आहे.त्यानंतर श्री अनिरुद्धांनी मला श्री विष्णू सहस्त्रनाम श्री मकरन्दाच्या पोथीनुसार शिकवण्यास सुरुवात केली.एके दिवशी पहाटे साडे तीन वाजता श्री नरसिंह ह्या नामाचे संकीर्तन चालू असताना शंख,चक्र,गदा,पद्म अशा स्वरुपात श्री महाविष्णूचे दर्शन झाले,व माझ्या आयुष्यातील उच्चतम घटना घडली.भानावर आल्यानंतर श्री अनिरुद्धांनी मला जन्मजन्मांतरासाठी त्यांच्या सर्वात निकटचे स्थान देण्याचे वाचन दिले.माझ्या आयुष्यातील हा सर्वोच्च क्षण व पुढील सर्व भविष्यकाळातील पवित्र शाश्वती .
श्री अनिरुद्धांच्या सहवासात येणाऱ्या असंख्य व्यक्ती त्याचे स्वभाव,गुणदोष पूर्णपणे माहित असूनही श्री अनिरुद्धांचे सर्वांशी असणारे मधुर भाषण,प्रेमळ व्यवहार आज आपल्या सर्वांच्याच प्रचीतीस येत आहेत.त्यांच्या कर्तुमअकर्तुम अन्यथा कर्तुम अशा स्वयंभू सामर्थ्याची जाणीव आज अनेक लोकांना येत आहे.तरीही स्वतःविषयी एकही शब्द न बोलता,स्वसामर्थ्याची मुद्यामधून ओळख न करू देता,प्रत्येक व्यक्तीसमूहामध्ये सर्वसाधारणपणेच सामान्य माणसापणे वावरणाऱ्या ह्या माझ्या परमेश्वराला माझे शतशा: प्रणाम.
माझ्या आयुष्याचे सोने ज्या परीसामुळे झाले त्या परिसाचा स्पर्श सर्व प्रेमार्त,श्रद्धाळू व पवित्र जीवांना होवो तसेच ह्याच परीस स्पर्शाने अपवित्र व चुकीच्या मार्गाने जाणार्यांना योग्य मार्गाची ओळख पटो हीच त्यांच्याच चरणी प्रार्थना
!! हरि ओम !!
No comments:
Post a Comment